पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप


पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे (Pune) शहर गेल्या काही महिन्यांपासून पेपरफुटीचं (Paperleak) केंद्र बनल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात होत आहे. नीट पेपरफुटीचं थेट कनेक्शन पुण्यात आढळून आलं, तर सीईटी परीक्षेचाही पेपर फुटला. त्यानंतर, आता एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याने राज्यातील पेपरफुटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच, पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाने जीवन संपल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwadhan sapkal) आणि कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाने पेपरफुटी आणि आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रथमेश देशमुख असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील परंड्याचा रहिवाशी आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणावर अडीच लाख रुपयांचे कर्ज होते, त्याच आर्थिक अडचणीतून प्रथमेशने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, प्रथमेशने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून पेपरफुटीवरुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनीही सरकारवर हल्लाबोल करत एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

एमपीएससी अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

पेपरफुटीच्या प्रश्नावर सरकार जबाबदारी झटकतंय, पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मोर्चात काँग्रेस पक्ष सक्रीय होता. MPSC अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा किंबहुना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच भ्रष्टाचार आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा घ्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीय. एमपीएससी अध्यक्षांनी राजीनामा न दिल्यास MPSC अध्यक्ष मुख्यमंत्र्‍यांचे मित्र आहेत आणि त्यांनीच पेपरफुटीसाठी त्यांना नेमले होते असा अर्थ निघेल, असेही सपकाळ यांनी म्हटले. महाराष्ट्र सरकार आंधळं बहिरं आहे, धाराशिवमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली, हा सरकारने घेतलेला बळी आहे. त्यामुळे, प्रथमेश यांच्या आत्महत्येस सरकार जबाबदार आहे. प्रथमेशच्या आत्महत्येनंतर तरी आता अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीय. 

अभिजीत दिपकेंचाही सरकारवर संताप

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही प्रथमेशच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन करत, कुणीही टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारसाठी तुमचा जीव महत्त्वाचा नसेल, पण तुमच्या कुटुंबीयांसाठी अधिक मोलाचा आहे, असे अभिजीत दीपके म्हटले. तसेच, ग्रामीण भागातून पुण्यात परीक्षेची तयारी करण्यासाठी येणाऱ्या मुलांची व्यथा देखील त्यांनी मांडली.  

हेही वाचा

जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *